– शहरात दररोज १० ते १५ बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ
पिंपळगाव बसवंत: जिल्ह्यातील महत्वाची बाजार पेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाची धास्ती दिवसागणिक वाढत आहे. शहरातील बाधित रुग्णांसह संपर्कात आलेल्याकडून होम आयसोलेशन उपचार पद्धतीला पसंती दिली जात आहे. शहरात दररोज १० ते १५ बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून पिंपळगाव कोविड सेंटरमध्ये ८२ रुग्ण तर सिद्धिविनायक कोविड केअर सेंटरमध्ये ५० असे १३२ बाधित रुग्ण सध्यस्थीतीत उपचार घेत असल्याने पिंपळगावकरांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागासह ग्रामपालिका प्रशासनाने केले आहे.
पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेली कोरोना बधितांची संख्या मार्च महिन्याच्या प्रारंभी पासून वाढू लागल्याने प्रशासन मात्र पुरते धास्तावले आहे. पिंपळगाव कोविड सेंटरला सध्यस्थीतीत ८२ बाधित रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी बहुतांशी रुग्ण गृह विलीगिकरण खाली उपचार घेत आहेत. तर सिद्धिविनायक कोविड सेंटरमध्ये सध्यस्थीतीत ५० बाधित रुग्ण उपचार घेत असून बधितांच्या संपर्कात आलेल्या ३०० हुन अधिक होम क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागाचे ज्ञानेश्वर जाधव, यांच्यासह सिद्धिविनायक कोविड सेंटरचे डॉ अरुण गचाले यांनी दिली.
कोविड केंद्रास संपर्क साधावा
पिंपळगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे, टाळावे, शिवाय नियमित मास्कचा वापर करावा, कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यास तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह पिंपळगाव कोविड केंद्रास संपर्क साधावा
डॉ रोहन मोरे, तालुका वैद्यकीय अधीक्षक
…………….
शटर बंद, दुकान चालू !
जिल्हाधिकाऱ्यांकडून नाशिक जिल्हात शनिवार, रविवार कडक बंद ठेवण्याचे आदेश असताना पिंपळगाव बसवंत शहरात मात्र शनिवार, रविवार बंद दिवशी काही निवडक व्यवसायिकांकडून शटर बंद करून आतमध्ये काम केले जात असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे मात्र सपशेल दुर्लक्ष होत असल्याने नियम मोडणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.