पिंपळगाव बसवंत: कोविड १९ पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांनुसार यंदाच्या तिथीनुसार ३१ मार्च रोजी शिवजयंती सोहळा साजरा करावा, शहरात मिरवणूक, बाईक रॅली काढण्यात पूर्णतः बंदी घालण्यात आली असल्याने शांततेच्या मार्गाने कोविड १९ चे नियम पाळत शिवजयंती प्रतिमा पूजनाने साधेपणाने साजरी करावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी केले.
पिंपळगाव पोलीस ठाण्यात तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली.याप्रसंगी पोलीस निरीक्षक पटारे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुजीत मोरे, तालुका सहसंपर्कप्रमुख किरण लभडे, शहरप्रमुख नितीन बनकर, आशिष बागुल, निलेश मोरे, अमोल बिडवे, अक्षय विधाते, आदीसह शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी भाऊसाहेब पटारे म्हणाले की, शहर व परिसरात शिवजयंती पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे शिवप्रेमींनी काटेकोर पालन करावे, शिवजयंतीत शहरात पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणूक काढण्यास कायद्याने परवानगी नसल्याने यंदा शांततेच्या मार्गाने फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करत शहरात प्रतिमापूजनाने साध्यापणाने शिवजयंती साजरी करत पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पटारे यांनी केले.
प्रतिमापूजनास परवानगी …
आगामी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या कोविड १९ नियमानुसार शहरात फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करत प्रतिमापूजन करण्यास परवानगी असल्याने पिंपळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या निफाड फाट्यावर शिवजयंतीदिवशी कोरोना नियमांचे पालन करत सकाळी प्रतिमपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.