पिंपळगाव बसवंत – येथील पीएनजी टोल नाक्यावरील अनधिकृत दुकानांमुळे गुन्हेगारी वाढत आहे. सदर प्रकार थांबविण्यासाठी दुकाने बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निफाड तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पोलीस आणि पीएनजी टोल व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
खरे तर पिंपळगाव बसवंत शहर मोठी बाजारपेठ आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्याने या शहराला अजूनच महत्त्व प्राप्त झाले आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांद्यासह इतर शेतमालाची बाजारपेठ असल्याने परराज्यातूनही व्यापारी, कामगारांचा राबता असतो. त्यातच महामार्गावरील पीएनजी टोल नाक्यावरील अनधिकृत दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू लागली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदर दुकाने तातडीने बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निफाड तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पीएनजी टोल, पिंपळगाव बसवंत पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, रिपाइंचे जिल्हा संघटक भारत गांगुर्डे, विकार शेख, सचिन गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, अशोक पठारे आदी उपस्थित होते.
गुन्हेगारी थांबविण्यासाठीच प्रयत्न
पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावरील अनधिकृत दुकानांना आपला कधीच विरोध नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. या घटनांमुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे सदर दुकाने बंद करावीत.
– महेंद्र साळवे, निफाड तालुकाध्यक्ष. रिपाइं
दुकाने काढण्यासाठी पत्रव्यवहार
पीएनजी टोल नाक्यावरील अनधिकृत दुकानांमुळे रात्रीच्या वेळी गुंड प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. सदर दुकाने हटविण्यासाठी पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला पत्रव्यवहार केलेला आहे.
– नवनाथ केदार, व्यवस्थापक, पीएनजी टोल-वे, पिंपळगाव बसवंत
दुकाने हटविण्याची जबाबदारी टोलची
पिंपळगाव टोलवरील अनधिकृत दुकानांमुळे गुन्हेगारी वाढत असल्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेतली आहे. परंतु, सदर दुकाने हटविण्याची जबाबदारी टोलची असून, याबाबत आम्ही टोल व्यवस्थापकांना पत्र दिले आहे.
– भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत