पिंपळगाव बसवंत : मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी चिटणीस, पिंपळगाव बसवंत खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक प्रतापदादा मोरे यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. निफाड तालुक्याच्या राजकारणात एक संयमी नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक सहकारी संस्थांवर त्यांनी काम केले. तर दगू नाना मोरे ग्रामीण ही पतसंस्था सुरू करून गोरगरीब, छोट्या व्यावसायिकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मदत केली. दिवंगत डॉ. वसंतराव पवार, मविप्र सरचिटणीस निलिमाताई पवार, मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते, आमदार दिलीपराव बनकर यांच्यासोबत कार्यरत राहून त्यांनी स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबवले. तर आपल्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वामुळे जिल्हाभरात त्यांनी मोठा मित्र परिवार जमा केला. “सहकार क्षेत्रातील दादा” नावाचे पर्व काळाच्या पडद्याआड गेल्याने निफाड तालुक्यात शोककळा पसरली आहे