सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी निवेदनाद्वारे मागणी
पिंपळगाव बसवंत: ग्रामपंचायत ही एक स्वराज्य संस्था आहे, जिथे स्थानिकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच, स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करुन राबविण्याचा संपूर्ण आधिकार असलेली घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे गावकारभा-यांना विकासाचे धडे देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी लिना बनसोड, निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात आताच नव्याने ६२१ ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. यात नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव कारभाराच्या चाव्या हाती घेतल्या आहे. म्हणून या नवनियुक्त गाव कारभाऱ्यांना ग्रामपंचायत अधिनियमान्वये जबाबदारी व कर्तव्ये, ग्रामपंचायतीचे कामकाज, ग्रामपंचायत लेखासंहिता, ई- ग्रामपंचायत, जलसाक्षरता, वेळेचे व्यवस्थापन, गावाच्या शाश्वत विकासासाठी गावसंस्था नियंत्रण, राज्य सरकार व केंद्र सरकारची ध्येयधोरणे व गाव विकासाच्या विविध योजना आदी विषयांवर प्रशिक्षण देण्याची मागणी काजळे यांनी केली असून सदर प्रशिक्षण लवकरात लवकर मिळावे व ते तालुक्याच्या ठिकाणी घ्यावे असेही काजळे यांनी म्हटले आहे.
प्रशिक्षणामुळे कामकाजाचा अनुभव येणार
ह्या प्रशिक्षणाने गाव कारभाऱ्यांना कामकाजाचा अनुभव येणार आहे. गावगाड्याच्या कारभारत नविन महिला-पुरुषाची निवड झाली आहे. त्यांना गाव कारभारचा अनुभव नसतो यासाठी गावाच्या विकासासाठी हे प्रशिक्षण गरजेचे आहे.
देवेंद्र काजळे, कारसुळ