पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गणपती विसर्जन करताना ग्रामपालिका कर्मचा-याचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १) घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी गणेश विसर्जन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने महामार्गावरील कादवा नदी पुलावर दरवर्षीप्रमाणे पाळण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणपती विसर्जन करताना तीन कर्मचारी कादवा नदीपात्रात बुडाले. या कर्मचा-यांना वाचविण्यासाठी रवींद्र रामदास मोरे (वय ३६) या कर्मचा-याने पाण्यात उडी मारली. अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी मोरे यास तत्काळ पाण्याबाहेर काढून राधाकृष्ण हाॅस्पीटलमध्ये दाखल केले. यावेळी डाॅक्टरांनी तपासणी करून रवी यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.
याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ, पोलीस काॅन्स्टेबल योगेश बुरूंगले, पोलीस काॅन्स्टेबल नितीन जाधव करीत आहे.
प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला
गणपती विसर्जन करताना लाईफ जॅकेट घालण्याची गरज होती. मात्र, मंगळवारी गणेश विसर्जन करताना काही कर्मचा-यांनी लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. त्यामुळे पाण्याचा वेग जास्त असताना तीन कर्मचारी नदीपात्रात बुडू लागले. या कर्मचा-यांना वाचविण्यासाठी रवींद्र मोरे याने पाण्यात उडी मारली खरी; मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे आणि लाईफ जॅकेट घातलेले नसल्याने रवींद्रचा दुर्दैवी मृत्यू झाला.