पिंपळगाव बसवंत – ग्रामपंचायतमार्फत मातंग वाड्यात दिवाबत्तीसाठी उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबाला शॉक लागून ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील मातंग वाड्यामध्ये ग्रामपंचायतमार्फत दिवा बत्तीसाठी उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबाला पावसामुळे करंट उतरला होता. यावेळी येथील पाच वर्षीय चिमुकली खेळत असताना त्या विजेच्या खांबाला हात लागल्याने शॉक लागून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंडित वाघ, योगेश बुरगुले, नितीन जाधव आदी तपास करीत आहे.
शेळीनंतर चिमुरडीलाही शॉक
गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याच विद्युत दिवाबत्तीच्या खांबाचा एका पाळीव शेळीला शॉक लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने ती शेळी बचावली. परंतु, त्या घटनेचे गांभीर्य ना स्थानिक नागरिकांनी लक्षात घेतले ना ग्रामपंचायत प्रशासनाने. त्यामुळे पुन्हा त्याच विद्युत खांबाचा शॉक लागून एका पाच वर्षीय चिमुरडीचा निष्पाप बळी गेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक नागरिक किती बेजबाबदार आहे, हे लक्षात येते.