पिंपळगाव बसवंत : येथील गृहनिर्माण सोसायट्यांचा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये समावेश करण्यात येणार आहे. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ६) झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. सोसायटीधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सहा गृहनिर्माण सोसायट्यांचा यात समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या गृहनिर्माण सोसायट्या वर्ग-२ मध्ये आहेत, त्या सोसायट्यांचा १५ टक्के नजराणा भरून वर्ग ‐१ मध्ये समावेश होणार आहे. परंतु, ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानंतर तीन वर्षांच्या आतच हा लाभ मिळणार असून, त्यानंतर ६० टक्के नजराणा भरावा लागणार आहे. याबाबत जनजागृती नसल्याने शुक्रवारी बैठक घेऊन सदर माहिती देण्यात आली. त्यामुळे सोसायटीधारकांचा आर्थिक फायदा होणार असून, शासनाच्या सर्व सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी (दि. ६) निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्या उपस्थितीत सहा गृहनिर्माण सोसायट्यांच्या सभासदांची बैठक उंबरखेड रोडवरील शास्रीनगर येथील सभागृहात झाली. त्यावेळी सर्व गृहनिर्माण संस्थेतील सभासदांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली मिळकत दोन ऐवजी वर्ग-१ मध्ये करून घेण्याचे आवाहन तहसीलदार घोरपडे यांनी केले.
या बैठकीला मंडल अधिकारी नीळकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव, जितेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
या सोसायट्यांचा समावेश
निर्मल सोसायटी, स्वामी विवेकानंद सोसायटी, महाराष्ट्र राज्य कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था, वैशाली सहकारी गृहनिर्माण संस्था, शास्त्रीनगर सहकारी निर्माण संस्था, अभिनंदन सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायट्यांचा यात समावेश आहे.
असा होईल फायदा
८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार तीन वर्षांच्या आत म्हणजेच ८ मार्च २०२२ पूर्वी या योजनेचा लाभ घेणार्या सभासदांनाच १५ टक्के नजराणा भरता येणार आहे. त्यानंतर मात्र ६० टक्के नजराणा भरावा लागेल. वर्ग – २ मधून वर्ग – १ मध्ये समावेश झालेल्या संस्थांना भविष्यात खरेदी-विक्रीची परवानगी, तसेच कुठलेही शासकीय शुल्क भरण्याची गरज पडणार नाही.
….
जनजागृतीसाठी बैठक
८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयाबाबत गृहनिर्माण संस्थांचे सभासद अनभिज्ञ होते. त्यामुळे या निर्णयाची जनजागृती करण्यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. या योजनेचा सभासदांनी लाभ घ्यावा.
– शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड