पिंपळगाव बसवंत: कोरोनाने सर्वत्र हातपाय पसरल्याने त्याला लाखो नागरिक बळी पडत आहे. आरोग्य प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत असताना खाजगी रुग्णालये मात्र कोरोना बाधित रुग्णकडून लाखोंची बिले वसूल करत असल्याने हे नियमबाह्य आहे. प्रशासनाने पिंपळगाव शहरातील सर्व खाजगी रुग्णालयाना शासकीय नियमानुसार दरपत्रक बंधनकारक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे , मनवीसेची मंडळअधिकारी नीलकंठ उगले यांनी ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सूचित करण्यात येते की सध्या कोरोनाची भयंकर जागतिक साथ सुरू असून त्यात लाखो नागरिक बळी पडले आहे. सर्वजण करुनाला हद्दपार कसे करावे यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र कोरोना लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिलाची आकारणी सध्या खाजगी रुग्णालयाच्या मार्फत सुरू आहे. रुग्णांची परिस्थिती बघता आकारण्यात येत असलेले बेकायदेशीर भरमसाठ बिल हे माणुसकीलाच नव्हे तर प्रशासनाला देखील धोका देणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणास सूचित करण्यात येते की पिंपळगाव बसवंत शहरातील सर्व छोट्या-मोठ्या खाजगी हॉस्पिटलला प्रत्येक औषध व रुग्णांना करण्यात येणाऱ्या सर्व गोष्टींचे शासकीय नियमानुसार दरपत्रक जाहीर करावे व ते दर पत्रक हॉस्पिटलच्या बिल काऊंटर जवळ लावण्यास संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला सूचना द्याव्या. सुचनेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आपल्याकडून आदेश जारी करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल मनसेने निवेदनात दिला आहे.
निवेदन देतांना मनसे विद्यार्थी सेना विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे, मनसे विधानसभा अध्यक्ष मनसे शिवमूर्ती खडके,मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष नितेश झूटे,आकाश काठे,पियुष पाटील,समाधान फाळके,निलेश सोनवणे,ॠतिक बनकर,कैलास लभडे,इ मनसे सैनिक उपस्थित होते.