दररोज १५० जेवणाच्या डब्याचे मोफत वाटप
पिंपळगाव बसवंत: कोरोना महामारीचा सर्वत्र प्रकोप झाल्याने कोरोना काळातही न डगमगता पिंपळगाव बसवंत शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांसाठी येथील जैन समाज खऱ्या अर्थाने आधार ठरत आहे. शहरात कोरोना संक्रमित रुग्णांसह इतर रुग्णांना दोन वेळेचे मोफत जेवण देण्याचा अभिनव उपक्रम जैन समाजाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत शहरातील सचिन सोनी व समीर सोनी या सोनी बंधूंच्या संकल्पनेतुन व पुढाकाराने गेल्या १५ दिवसापासून अन्नदानाचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुग्णांना जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम सुरू असून आत्तापर्यंत १२०० हून अधिक जेवणाच्या डब्याचे वाटप करण्यात आले.
शहरातील जैन बांधवांनी सामाजिक बांधलकी जोपासत व्हाट्सअप्पच्या माध्यमातून ग्रुप खुला करून दिवसाकाठी शहरामधील कोणत्या रुग्णालयांना किती रुग्णांना जेवणाचे डबे लागतात या संदर्भत संबंधित खानावळ चालकांना जैन समाजाच्या वतीने माहिती दिली जाते.त्या माहितीच्या आधारावर प्रत्येक रुग्णालयात सकाळ व सायंकाळी हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण्यांच्या डब्यांची मोफत पोहच केली जात आहे.जैन बांधवांचा या अभिनव उपक्रमामुळे रुग्णांच्या जेवणाची सोय मोफत होऊ लागल्याने या उपक्रमात इतरांनीही सहभागी होण्याचे आवाहन सचिन सोनी, समीर सोनी, अल्पेश पारख, शांतीलाल बुरड,दिनेश बागरेचा,स्मित शहा, गौरव संकलेचा, स्वप्नील शहा,अभीषेक शहा, घनश्याम शर्मा, बंटी बोथरा,मिलींद कोचर आदींनी केले आहे.