पिंपळगाव बसवंत: मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शिवारातील शनी मंदिर परिसरात नाशिककडून पिंपळगाच्या दिशेने जाणाऱ्या कार अपघातात १८ वर्षीय मयुरी पंडित चौरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कुटुंबातील आई, वडील, भाऊ व चालक असे ४ जण गंभीर जखमी झाले.हे सर्व जण बागलाण तालुक्यातील बाभुळना पो.अलियाबाद येथील रहिवासी असून त्यांच्यावर पिंपळगाव खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस व पिंपळगाव पोलीस कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केली.
पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शिवारातील शनी मंदिर परिसरात फेल झालेला ट्रक क्रमांक एम एच १५ बीजे ३३०२ हा महामार्गावरील पहिल्या लेनवर नादुरुस्त झाल्याने उभा होता. नाशिकच्या दिशेने पिंपळगावकडे जाणाऱ्या व पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टाटा कंपनीची टियागो कार क्रमाक्र एम एच ०५ डीएच ९३५७ च्या चालकास या उभ्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार थेट उभ्या ट्रकला घासून दुसऱ्या लेनवर आली. त्यानंतर पाठीमागून अचानक आलेल्या ४० गाव डेपोच्या बस क्रमांक एम एच २० बीएल २४१० धक्का कारला बसला. त्यामुळे कार थेट बाजूच्या कुपाटीत पलटी झाली. या भीषण कार अपघात पोलीस कुटुंबातील १८ वर्षीय मयुरी पंडित चौरे हीचा मृत्यू झाला. तर पोलिस हवालदार पंडित बाबुराव चौरे, वय ४७, वैशाली पंडित चौरे, वय ३१, सागर पंडित चौरे वय २२, चालक संजय एन बागुल वय ४२ रा. हे जखमी झाले. हे सर्व बागलाण तालुक्यातील बाभुळना पो.अलियाबाद येथील रहिवासी असून हल्ली नोकरी निमित्त मुंबई येथे स्थायिक आहे. या सर्व जखमींव पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातात कारचा पुंर्णपणे नुकसान झाले. तर बसच्या पुढील बाजुचे व नादुरुस्त ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एकनाथ पवार अधिक तपास करत आहे.
पोलिसांसह स्थानिकांनी केली मदत…..
अपघाताची घटना घडताच महामार्ग पोलीस, पिंपळगाव पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी पलटी झालेल्या कारला सरळ करत कारमधील जखमींना तातडीने बाहेर कढाले. स्थानिकांनी दिलेल्या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचले.
पोलिसांकडूनच नियमांना हरताळ….
वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलीस विभागाकडून स्पिडोमीटर ही संकल्पना राज्यभर राबविण्यात येत आहे. वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत असते. पण, पोलिसांकडूनच या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे कोकणगाव शिवारातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या झालेल्या वाहनाच्या भरगाव अपघातामुळे समोर आले आहे.