पिंपळगाव बसवंत – “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेताघेता देणाऱ्याचे हातही घ्यावे”, या कवी विं. दा. करंदीकरांच्या उक्तीप्रमाणे निफाड तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायत आणि प्राथमिक शाळेला वाॅटर फिल्टर युनिट प्रदान करण्यात आले.
एचएएलच्या फंडातून कोकणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व येथील गावकऱ्यांसाठी ५ रुपयांमध्ये १० लिटर पाणी मिळणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांना एटीएमचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये रिचार्ज करून पाणी मिळेल. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे, हा यामागील हेतू आहे. कारण बऱ्याच आजारांची लागण अशुद्ध पाणी पिऊन होते. म्हणून सामाजिक हिताचा योग्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जलशुद्धी करणारे यंत्र ओझर एचएएलच्या सामाजिक उत्तरदायित्व फंडातून शालेय आवारात बसविण्यात आले. यावेळी एचएएलचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण कुमार यांच्या हस्ते या जलशुद्धीकरण यंत्राचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी एचएएलचे विजय पठाडे, पंकज जाधव, प्रशांत डेंगळे, कोकणगावचे सरपंच अंबादास गांगुर्डे, उपसरपंच गोटीराम मोरे, ग्रा. पं सदस्य भारत मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यादव मोरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.