पिंपळगाव बसवंत – शासनाचा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळालेल्या पिंपळगाव बसवंत प्राथमिक रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांना थेट आपल्या खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २८) उघडकीस आला आहे. यासंदर्भात येथील एका रुग्णाने तालुका वैद्यकीय अधिका-याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे गुरुवारीदेखील संशयित कोरोना रूग्णाला कोव्हीड सेंटरमध्ये जाण्याऐवजी खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना काळात कर्मचा-यांचाअभाव म्हणून पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून तात्पुरत्या स्वरूपात डॉ.जयेश निकुंभ यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या प्राथमिक रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या रूग्णांना घाबरवून देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळाला व आईला धोका आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात नेऊनच प्रसूती करावी लागेल, नाशिक जिल्हा रुग्णालयात चांगले उपचार होत नाही, त्यासाठी सदर वैद्यकीय अधिकारी थेट आपल्या खासगी रुग्णालयात प्रसूती करण्याचा अजब सल्ला देत आहे. त्यामुळे शासकीय सेवेचा असाही दुरुपयोग एका स्त्री रोग तज्ज्ञाकडून पिंपळगावसारख्या शहरात घडत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना तातडीने प्रसूतीसह इतर आरोग्याच्या सोयी सुविधा अवघ्या ५ रुपयांत मिळत असल्याने रुग्णांचा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ओढा कायम असताना शासकीय सेवेच्या नावाखाली येथील स्त्री रोग तज्ज्ञांकडून रुग्णांना प्रसुतीसाठी आपल्या खासगी रुग्णालयाची वाट दाखवली जात असल्याबाबत लेखी तक्रारी प्राप्त झाल्याने याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना यामुळे आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे सदर स्त्रीरोग तज्ज्ञावर तातडीने कारवाई करण्याची मागणी तक्रारदार जयश्री निपुंगे, वैशाली पवार, अंजू चव्हाण, योगेश विधाते आदींनी केली आहे.
खासगी रुग्णालयात प्रसूती करून देण्याचा सल्ला दिला
प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आल्यानंतर तपासणी न करता, प्रसूती इथे का करता, असा प्रश्न स्त्री रोग तज्ज्ञांनी केला. खासगी रुग्णालयात ४० हजार खर्च येत असल्याने या ठिकाणी आम्ही आलो. मात्र, येथील स्त्री रोग तज्ज्ञांनी १५ हजारात त्यांच्या खासगी रुग्णालयात प्रसूती करून देण्याचा सल्ला दिला.
– जयश्री निपुंगे, रुग्ण
…..
खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला नाही
मी कोणत्याही रुग्णाला खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून रुग्णांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाला कुठे जायचे तो त्यांचा प्रश्न आहे.
– जयेश निकुंभ, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळगाव बसवंत
…..
डॉक्टर – रुग्णांमध्ये बाचाबाची
संबंधित प्रकार रुग्णांच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉक्टरांना थेट विचारणा केली असता याबाबत डॉक्टर व रुग्णांमध्ये बाचाबाची झाल्याची चर्चा आहे.