पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील कारसूळ येथील रौळस रोडवरील पाझर तलावाच्या खोलीकरणास प्रारंभ झाला असून, आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांमुळे शेतशिवार ओला होणार आहे. खोलीकरणानंतर या तलावात सुमारे एक क्यूसेस पाणी अडविले जाणार आहे.
कारसूळच्या रौळस रोडवरील पाझर तलावाचे खोलीकरण आणि स्वच्छतेसाठी गावातील तरुण नितीन ताकाटे यांनी आमदार दिलीप बनकर यांना साकडे घातले होते. आमदार बनकर यांनी तत्काळ लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर केला. मंगळवारी (दि. ९) या कामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला. या कामामुळे परिसरातील शेती ओलिताखाली येणार आहे.
यावेळी सरपंच आशा ताकाटे, उपसरपंच उज्वला गांगुर्डे, सदस्य शामराव शंखपाळ, अमोल ताकाटे, पूनम पगार, मनीषा काजळे, भाऊसाहेब कंक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नितीन ताकाटे, ग्रामस्थ नंदू पगार, सचिन पगार, वायरमन कृष्णा साळुंखे आदी उपस्थित होते.
सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार
कारसूळ गावातील नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून पाझर तलावाच्या खोलीकरणाला मंजुरी दिली. यामुळे परिसरात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
– दिलीप बनकर, आमदार, निफाड