पिंपळगाव बसवंत : कृषि विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पिंपळगावकरांनी पाठींबा दिला. बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. तर, दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी विधेयकांची होळी केली. कृषि विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वच संघटना आक्रमक झाल्या आहेत. या विधेयकाला कडाडून विरोध करीत मंगळवारी (दि. ८) भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदला निफाड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपळगाव बसवंत, कारसूळ येथे बंदला प्रतिसाद मिळाला. पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. पिंपळगाव शहरातही कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी केली. भारत बंदला सक्रिय सुरूवात केली. तसेच केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहे. त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली. जोरदार घोषणा केंद्र सरकारच्या विरोधात देण्यात आल्या.
कारसूळ, लोणवाडीत कडकडीत
निफाड तालुक्यातील कारसूळ, लोणवाडी येथे भारत बंदला प्रतिसाद लाभला. कारसूळ येथील ज्येष्ठ नागरिक संजय जगताप यांनी सकाळपासूनच ग्रामस्थ व व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृषी विधेयक शेतकर्यांसाठी मारक असून, त्यामुळे बळीराजाचे नुकसान होणार आहे. याचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून सदर विधेयक मागे घ्यावे अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली.
या बंदमध्ये शिवसेनेचे कारसूळ शाखा प्रमुख योगेश शंखपाळ, मनोज कडपे, ज्येष्ठ नागरिक संजय जगताप, ज्ञानेश्वर ताकाटे, बाबुराव ताकाटे, संपत कडाळे, अमोल ताकाटे, नीलेश ताकाटे, संदीप सगर, संदीप शंखपाळ, ॠषिकेश ताकाटे आदी सहभागी झाले होते.
फोटो ओळी