पिंपळगावं बसवंत – साहित्य, राजकारण, शेती अशा क्षेत्रात उत्तूंग कामगिरी करणारे विनायकदादा पाटील हे पिंपळगांवचे भाचे होते. त्यांचे बालपण पिंपळगावमध्ये गेले. ओघवत्या वाणीतील ताकदीचे वक्ते, प्रतिभावंत लेखक व कुंदेवाडीचे सरपंच ते राज्याचे मंत्री अशी झेप घेणारे विनायकदादा यांचे व्यक्तीमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या अखेरच्या निरोपाने बहुआयामी मार्गदर्शक हरपला असल्याच्या भावना पिंपळगावकरांनी व्यक्त केल्या. प्रतापराव मोरे यांचेही शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील योगदान भरीव होते, अशा संवेदना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
वनाधिपती विनायकदादा पाटील व मविप्रचे माजी चिटणीस प्रतापराव मोरे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंला गुरुवारी (दि. ५) शोकसभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मान्यवरांनी शोकसंदेशात पाटील व मोरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे म्हणाले की, कुंदेवाडीचे सरंपच ते राज्याचे मंत्री असा विनायक दादा यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सर्वच क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या दादांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. प्रतापदादा मोरे यांचे समाजासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील.
प्रा. प्रकाश मोरे, प्रा. रवींद्र मोरे, उध्दव निरगुडे, सतीश मोरे यांनी पाटील व मोरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पिंपळगाव सोसायटीच्या सभागृहात झालेल्या शोकसभेस सोमनाथ मोरे, चंद्रकांत खोडे, प्रकाश महाले, शशी मोरे, कचरू शिंदे, जगन्नाथ महाले, प्रशांत घोडके, कारसूळचे देवेंद्र काजळे आदी उपस्थित होते.