नाशिक – गेल्या काही दिवसांपासून शहरावर घोंगावत असलेले पाणी कपातीचे संकट पावसाने लांबविले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या पावसाने गंगापूर आणि दारणा धरणातील साठ्यात लक्षणीयरित्या वाढ केली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ६७ टक्के तर दारणा धरण ९३ टक्के भरले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेकडून पाणी कपातीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यातच हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा आगामी तीन दिवसांसाठी दिला आहे. जर नाशिक परिसरात पाऊस झाला तर गंगापूर धरणाच्या साठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर पाणी कपात कायमची टळू शकते.