नाशिक – शहरात मुसळधार पावसाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास हजेरी लावली. अचानक धो धो पाऊस आल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. १५ मिनिटांतच तब्बल ११ मिलीमीटर पाऊस झाल्याची हवामान केंद्रात नोंद झाली आहे. शहरातील सराफ बाजार, दही पूल, द्वारका, मेनरोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्यावरील वाहतूकही बाधित झाली. काही इमारतींच्या भागातही पावसाचे पाणी साचले. तर सिडको परिसरात कारी घरांमध्ये पाणी शिरले. जवळपास दोन तास चाललेल्या या पावसाने नाशिककरांची चांगलीच धावपळ उडाली. शहराच्या काही भागात वृक्षही उन्मळून पडले आहेत. महापालिका अग्निशमन विभागाने ते तातडीने बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.