मुंबई – राजधानी मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर आज (७ ऑगस्ट) अनेक ठिकाणी ओसरला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे यामुळे मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची दखल घेत मदतकार्य वेगाने सुरू झाले आहे.
मुंबईत पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. गुरुवारी मुंबईत चार तासात ३३० मिलिमिटर इतका विक्रमी पाऊस झाला. ताशी १०१ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. मध्यरात्री पाऊस ओसरला आहे. सकाळी पाण्याचा निचरा झाल्याने रेल्वे तसेच बेस्टची सेवा सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे. रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून तुरळक सरी कोसळत आहेत. राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) १६ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाच्या सरी चालूच आहेत.
सावित्री, आंबा, कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. पावसामुळे रोहा केळघर मार्गे मुरुड रस्ता खचला असून हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा मिळाला आहे.