मुंबई – गोदावरी मराठवाडा विकास महामंडळा अंतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा किमी. ८५ ते १२८.५० मधील कालवा दुरुस्ती कामाच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कालवा दुरुस्तीसाठी एकूण ३८ कोटी २ लक्ष रुपयांचे काम राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाले आहे. सदर कालवा दुरुस्तीच्या कामामुळे एकूण १ हजार हेक्टर क्षेत्र पुर्नस्थापित होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालखेड धरणाचे १९७५ साली पूर्ण करण्यात असून पालखेड डाव्या कालव्याचे काम १९८३ साली पूर्ण करण्यात आले आहे. पालखेड प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता २३.०१ दलघमी आहे. डाव्या कालव्याची लांबी १२८.५० किमी असून प्रकल्पाचे लागवडीलायक क्षेत्र ६५०४५ हेक्टर असून सिंचनक्षेत्र ४१,५८० हेक्टर आहे. त्यापैकी पालखेड डावा कालवा किमी ११० पर्यंत आठमाही असून त्याचे सिंचनक्षेत्र ३८,५०० हेक्टर असून लागवडीलायक क्षेत्र ५७,१५३ हेक्टर इतके आहे. किमी ११० ते १२८.५० पर्यंत पालखेड डावा कालवा फक्त खरीप कालवा असून त्याचे सिंचनक्षेत्र ३०८० हेक्टर इतके असून लागवडीलायक क्षेत्र ७८९२ हेक्टर इतके आहे. पालखेड उजवा कालवा हा बारमाही कालवा असून त्याची लांबी १९.२० किमी. व सिंचनक्षेत्र २५९१ हेक्टर इतके आहे.
१९८०-८२ च्या काळात येवला तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार डाव्या कालव्याची लांबी वाढवून तो किमी १२८.५० पर्यंत वाढवण्यात येवून वितरिका क्र .४६ ते ५२ या वितरीकांद्वारे खरीप सिंचन करण्यासाठी व तसेच खरीप हंगामात नारंगी सारंगी धरण भरून देणेसाठी तयार करण्यात आला होता. नारंगी सारंगी मध्यम प्रकल्प, ता.वैजापूर जि. औरंगाबाद, या धरणात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून खरीप हंगामात डाव्या तट कालव्याव्दारे २०० दलघफु पाणी सोडण्यात येते. या कालव्याची वहन क्षमता कमी झाल्यामुळे नारंगी सारंगी धरण भरण्यासाठी सद्य : स्थितीत ५८ दिवसांचा कालावधी लागतो. सदर कालावधी कमी करण्यासाठी कालव्याची वहन क्षमता सुधारण्यासाठी विशेष दुरस्ती अंतर्गत कालवा दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे कालव्याची वहन क्षमता वाढून कमीत कमी कालावधीत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
नारंगी सारंगी प्रकल्पाच्या सोबत पालखेड डाव्या कालव्यावरील खरीप कालवा अंतर्गत असलेला वितरिका क्र . ४६ ते ५२ वितरिकांना पाणी द्यावयाचे झाल्यास कालव्याच्या किमी ११० ला कमीत कमी २२९ क्युसेक्स इतकी पाण्याची आवश्यकता असल्याने सदयस्थितीत आवर्तन कालावधित किमी ११० ला फक्त १२० क्युसेक्स इतकीच कालव्याची वहन क्षमता असून त्यामुळे वि.क्र. ४६ ते ५२ चे सिंचन चालू असताना नारंगी प्रकल्पात किमी १२८.०० ला पाणी देणे शक्य होत नाही व नारगी धरणात पाणी देण्यासाठी जास्तीचा कालावधी लागतो व कालव्याचा वहनव्यय वाढतो. या सर्व बाबींचा विचार करता कालव्यावरील सर्व रब्बी, खरीपाचे सिंचन व तसेच (good year) वेळेमध्ये नारंगीला कमी कालावधीत पाणी देता यावे व कालव्याचा वहनव्यय कमी व्हावा यासाठी कालवा नुतनीकरणाची कामे करणे अत्यंत आवश्यक होते. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने व पालखेड डाव्या कालव्याच्या विशेष दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर १००० हेक्टर क्षेत्र पुर्न : स्थापित होणार असल्याने सदर कामाकरीता दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून यासाठी ३८ कोटी २ लक्ष इतका निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.