नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शासनाच्यावतीने जवळपास दोन कोटींची मदत उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ आमदारांनी निधी दिला आहे. मात्र, मालेगाव मध्यचे एमआयएम पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती आणि विधान परिषदेचे आमदार नरेंद्र व किशोर दराडे हे बंधू असे तीन आमदार यांनी अद्याप संमेलनाला निधी दिलेला नाही. ही बाब आढावा बैठकीत स्पष्ट झाली आहे. संमेलनास अजून निधीची आवश्यकता असल्याने नाशिकमधील विविध संस्थांनी संमेलनात आपले आर्थिक योगदानासाठी पुढे यावे, असे आवाहन अन्न राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निधी संकलनाबाबतची आढावा बैठक पालकमंत्री श्री.भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिक्कुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, साहित्य संमेलनाचे समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, संमेलनाचे मुख्य समन्वयक नितीन मुंडावरे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, विश्वास ठाकूर, दिलीप खैरे, राजाराम पानगव्हाणे,यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ६१ वर्षाच्या कालावधीनंतर नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यासाठी हि अभिमानस्पद बाब आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेबरोबरच याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिककराची आहे. त्यामुळे शहरातील विविध संस्थांनी व नागरिकांनी आर्थिक योगदानासाठी पुढे येवून लोकसहभाग वाढवावा. तसेच शहरातील हॉटेल चालकांनी देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राहण्याची, नास्ता व जेवणाची सोय करावी, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी बैठकित सांगितले.
संमेलनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना
साहित्य संमेलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. सर्व मराठी साहित्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या दुप्पट होणार आहे. तीन दिवसीय साहित्य संमेलेनास देशातून व राज्यातून अनेक साहित्यिक,लेखक ,कवी व रसिक मंडळी हजेरी लावणार आहेत. नाशिक शहराला साहित्य परंपरेबरोबरच परंतु जिल्ह्यांत आता अनेक धार्मिक पर्यटन स्थळही विकसित झाली आहेत.संमेलनासाठी येणारा प्रत्येक माणूस नाशिक मध्ये आल्यानंतर पर्यटन करुनच जाणार आहे. त्यामुळे उद्योगधंदा पर्यटन वाढणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
‘बालसाहित्य’ मेळावा ठरणार संमेलनाचे आर्कषण
साहित्य समंलेनात सर्वच वयोगटातील लोकांचा सहभाग असणार आहे. या ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून ४०० स्टॉल्स उभारले जाणार असून याव्यतिरिक्त पर्यटन, चित्रकला, शिल्पकला, प्रकाशन कट्टा, कवीकट्टा यासाठी सुद्धा वेगवेगळ्या हॉल्सची उभारणी करणयात येणार आहे. कवीकट्टयात आपल्या कविता सादर करण्यसाठी आजपर्यंत १ हजार ५३२ कविता प्राप्त झाल्या आहेत. संमेलनात बालगोपाळांसाठी ३ दिवसीय बालसाहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून यासाठी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित रहाणार आहे. त्यामुळे संमेलनातील ‘बालसाहित्य’ मेळावा संमेलनाचे आर्कषण ठरणार असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले.
साहित्य संमेलनास 16 लोकप्रतिनिधींनी दिली मदत
साहित्य संमेलनास आपल्या आमदार निधीमधून पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, निलम गोऱ्हे, डॉ.सुधीर तांबे, हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, राहुल ढिकले, दिलीप बनकर, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, दिलीप बोरसे अशा 16 लोकप्रतिनिधींनी साहित्य संमेलनास मदत आहे दिली.
जगभरातील मराठी साहित्यिकांना संमेलनाची उत्सुकता: सूरज मांढरे
समाजमाध्यमांमुळे साहित्य संमेलनाची प्रसिध्दी सातासमुद्रापार जाणार आहे. विदेशातील साहित्यिकांनाही नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत कमालीची उत्सुकता आहे. यादृष्टीन संमेलन यशस्वीतेसाठी सहभाग घेवून आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्याला १५१ वर्षपूर्ण झाली असल्याने जिल्ह्याच्या नावलौकिकाला साजेसा कार्यक्रम होणे आवश्यक असून साहित्य संमेलनाने ती संधी मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
साहित्य संमेलनास यांनी दिली मदत
नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष तथा रामबंधु मसाले समुहाचे हेमंत राठी यांनी सारस्वत बँकेच्यावतीने सात लाख रुपये व राम बंधु मसाले समुहाकडून ३ लाख अशी एकूण १० लाखाची मदत संमेलनासाठी जाहिर केली. तसेच संदिप फांउडेशने २०० व भुजबळ नॉलेज सिटी संस्थेने २०० पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच हॉटेल सिटी प्राईड, हॉटेल सुर्या, हॉटेल हॉलीडे ईन, हॉटेल एमराल्ड पार्क यांनी देखील येणाऱ्या काही पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.