मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. अनेकदा ते पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यामुळे ते टिकेचेही धनी झाले आहेत. आता मात्र ते पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. निमित्त आहे आमदारकीचे. पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे पंढरपूरच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
पार्थ यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली आहे. मात्र, त्यांना यश आले नाही. पार्थ यांचे पुनर्वसन करणे, पंढरपूर मध्ये एकतर्फी लढत घडवून आणणे आणि पंढरपूर परिसरात विकास घडवून आणण्यासाठी सध्या चर्चेचा फड रंगत आहे. अद्याप पक्षाकडून किंवा अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून कुठल्याही नावाला दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, चर्चा चांगलीच रंगली आहे.