पुणे – पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी पवार कुटुंबिय बारामतीत एकत्र आले आहे. यासाठी एक बैठक झाली त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार व त्यांच्या पत्नी उपस्थितीत होत्या. तर शरद पवार हे पुणे येथे होते. बारामतीत झालेल्या बैठकीनंतर वाद निवळला असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या पवार घराण्यात कोणताही कौटुंबिक वाद झाला की तो चर्चेचा ठरतो. पण, पवार कुटुंबिय एकत्र येऊन हा वाद मिटवतात. पण, पार्थला आजोबा शरद पवार यांनी फटकारल्यानंतर तो कमालीचा नाराज झाला. त्यामुळे त्याची नाराजी दूर करण्यासाठी पवार कुटुंबियांनी प्रयत्न केले.
काय होता वाद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे दोन विधान या वादाला कारणीभूत ठरले. श्रीराम मंदिर भूमीपूजन व सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाविकास आघाडीच्या भूमिकेशी सुसंगत नसणारे वक्तव्य पार्थने केले होते. त्यामुळे शरद पवार यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर त्यांनी माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीची किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे, अशा शब्दात पार्थला फटकारले. त्यानंतर अजित पवार यांनी बुधवारी रात्री तातडीने सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. पण, पार्थची नाराजी दूर झाली नाही. त्यामुळे बारामतीत ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे.