बंगळुरू – कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये एका अपार्टमेंटमध्ये एकाच वेळी तब्बल १०३ कोरोना रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एसएनएन राज लेक व्ह्यू या सोसायटीत नुकतीच एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर हे रुग्ण आढळले आहेत. अपार्टमेंटला कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आलं असून कोरोना निगेटिव्ह अहवालाचं प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच अपार्टमेंटच्या बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी १३ फेब्रुवारीला आरटी नगरच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणारे ४२ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले होते.
बृहन बंगळुरू महानगरपालिकेनं पुष्टी केली आहे की, बोमनहल्ली परिसरात राज लेकव्ह्यू अपार्टमेंट असून, तेथे १०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. महापालिकेनं आता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या असून, केरळहून आलेल्या लोकांना कोरोना निगेटिव्हचं आरटी-पीसीआरचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक केलं आहे. तसंच महापालिका प्रशासन बंगळुरूमधल्या रेसिडंट वेलफेअर असोसिएशनच्या (आरडब्ल्यूए) पदाधिकाऱ्यांच्याही संपर्कात आहे.
महापालिकेचे आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी मंगळवारी सांगितलं की, आरडब्ल्यूएच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून शहरातल्या कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली. कोरोना रुग्णांबाबत आरडब्ल्यूएनं वॉच डॉगच्या भूमिकेत राहून शहर प्रशासनाची मदत करावी, असं आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आलं.
बंद खोलीत कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये असं त्यांनी सांगितलं. वातानुकूलित वातावरणात कार्यक्रम आयोजित केल्यास कोरोना रुग्ण जलद गतीनं संसर्गाचं कारण ठरू शकतो. खुल्या हवेत घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमातही मास्क लावणं तसंच सोशल डिस्टन्सिंग राखणं बंधनकारक आहे, असं मंजूनाथ प्रसाद यांनी सांगितलं.