नाशिक – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ७) सह्याद्री फार्म्सच्या वतीने आयोजित ‘सह्याद्री संवाद’ कार्यक्रमात कच्छ (गुजरात) येथील उद्योजिका व पाबीबेन डॉट कॉमच्या संस्थापिका सौ. पाबीबेन रबारी यांची ऑनलाइन मुलाखत होणार आहे. रविवारी दु. १२ ते १.३० दरम्यान https://www.facebook.com/SahyadriFarms/ या लिंकवर फेसबुक लाइव्ह माध्यमातून ही मुलाखत ऐकता येईल. आदिपूर (गांधीधाम) येथील प्राचार्या भारती जोशी मुलाखत घेणार आहेत. अहमदाबात येथील कारीगर क्लिनीकचे संस्थापक डॉ. निलेश प्रियदर्शी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पाबीबेन यांच्याविषयी –
भटक्या आदिवासी समाजात जन्मलेल्या पाबीबेन यांच्या नशिबी खरं तर गायी-गुरं घेऊन देशभर भटकंती होती. सासरी जाताना मुलीने स्वतः भरतकामाच्या कलाकृती देण्याची त्यांच्यात प्रथा आहे. १७ वर्षांच्या पाबीनं अफलातून कलाकृती बनवल्या. तिनं डिझाइन केलेल्या पिशव्या योगायोगानं अमेरिकेत पोहोचल्या. अन् पाबीचा जीवनउत्कर्ष सुरू झाला ‘चूल आणि मूल’ या परीघाबाहेर जात त्यांनी स्वतःचं आयुष्य तर बदललं आणि शेकडो महिलांना रोजगार देत ही कला शिकवली. त्यांचा उद्योग लाखोंचा बनला आहे. ‘पाबी बॅग’ आता जगप्रसिद्ध ब्रँड बनला आहे. या बॅग हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या सिनेमांतही फेमस आहेत. पाबीबेन यांच्या २५ जगप्रसिद्ध डिझाइन ‘पाबी-जरी’ नावानं लोकप्रिय आहेत. ३६ व्या वर्षांच्या पाबीबेन जानकीदेवी बजाज पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्या मानकरी आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’ कार्यक्रमातही त्या नुकत्याच सहभागी झाल्या होत्या.