नाशिक – पाथर्डी फाटा येथे असलेल्या जितेंद्र मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्यांचे शोरूमला पावसामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाथर्डी फाटा येथे जितेंद्र मोटर्स चे इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांचे शोरूम आहे काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे याठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी. अचानकपणे शोरूम मधून धूर दिसू लागल्याने या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षक आणि काही कामगारांनी स्वतःचा जीव वाचवत तातडीने अग्निशामक दलाला याबाबतची माहिती दिली. सिडको एमआयडीसी तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विविध भागातील सुमारे सहा अग्निशामक दलाच्या बंबांच्या साह्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. रात्री उशिरापर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते. आग लागलेली असतांना बाहेर पाऊसही सुरू होता,त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.