मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले धर्मस्थळांचे दरवाजे अखेर येत्या दिवाळी पाडव्यापासून (१६ नोव्हेंबर) उघडणार आहेत. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. धर्मस्थळांमध्ये मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरद्वारे राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
येत्या सोमवारपासून राज्यात मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं उघडली जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीचं मंगल पर्व सुरू झालं आहे. मात्र, वर्षभर धुमाकूळ घालणारा कोरोनारूपी राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात दिला आहे. राज्यातल्या जनतेनं या काळात शिस्तीचं पालन केलं, त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, मात्र नियम, शिस्तीचं काटेकोर पालन सगळ्यांना करावंच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांमधली गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचं रक्षण करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.