नाशिक – येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर कालपासून सुरळीत सुरू झाल्या आहेत. राज्यभरातून दोन दिवसात ६० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिल्याचे कुलसचिव डॉ दिनेश भोंडे यांनी सांगितले आहे.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि सुटसुटीत ऑनलाईन परीक्षा प्रणाली तयार केल्यामुळे पहिल्याच दिवशी राज्यभरातून या परीक्षेला सरासरी ८५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सामोरे गेले. ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेत देता यावी, अशी लवचिकता ठेवण्यात आली आहे. विविध शिक्षणक्रमांकरिता ठरवून दिलेल्या दिवसाच्या प्रहरातील निर्धारित पाच तासापैकी कोणत्याही सलग दोन तासात विद्यार्थी ही परीक्षा देवू शकतात. पहिल्याच दिवशी पहिल्या प्रहरात ७७ टक्के तर, दुसऱ्या प्रहरात ८७ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी या ऑनलाईन परीक्षेला सामोरे गेले.
८० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद
एकूण १ लाख ९० हजार ३३९ परीक्षार्थी असून दिनांक ५ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या परीक्षा ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली. दोन दिवसात ६० हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या ऑनलाईन परीक्षा दिली. परीक्षार्थींसाठी अभ्यासक्रमनिहाय सकाळी ८ ते दुपारी १ व दुपारी ३ ते रात्री ८ असे दोन सत्र दिले असून त्यांनी या पाच तासापैकी कोणत्याही एका तासात पेपर द्यायचा आहे. एकुण ६० गुणाच्या पेपरसाठी ५० प्रश्न दिले जात असून त्यापैकी कोणतेही ३० सोडवायचे आहेत. मोबाईल, लॅपटॉप, संगणक या पैकी कोणतेही उपकरण या ऑनलाईन परीक्षेकरिता वापरता येऊ शकते. विविध विभागीय केंद्राना विद्यार्थी सहायता कक्ष सुरू करण्यात आला असून हेल्पलाईन नंबरही परीक्षार्थींना देण्यात आले आहेत.
संकटातही सकारात्मक दृष्टीकोन
कोरोनाच्या संकटातही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा या परीक्षेला दिलेल्या उदंड प्रतिसादातून सकारात्मक दृष्टिकोन दिसत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू प्रा ई वायूनंदन यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सहज सुलभतेने हाताळता येईल, असे तंत्रज्ञान विकसित केल्याने परीक्षार्थी अतीशय सकारात्मकतेने या परीक्षेला सामोरे जात आहेत, असेही ते म्हणाले.
—
विद्यापीठाला एकूण १० लाख परिक्षा घ्यायच्या आहेत. एका वेळी ३५ हजारावर विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यामुळे बँड विड्थ फेल्यूअर होऊ नये म्हणून ५ तासाचा स्लॉट ठेवलेला आहे. तसेच क्लाऊड सर्व्हरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सुरळीत परीक्षा सुरू आहेत.
– डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव