अमृतसर – पाकिस्तानी ड्रोनद्वारे रेकी आणि बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानने ड्रोनद्वारे भारतात हेरॉईन आणि शस्त्रे टाकल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा (आयएसआय) आता सदर शस्त्रे भारतीय तस्करांसह सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची तयारीत आहे. तथापि, बीएसएफ आणि पंजाब पोलिसांकडून सीमा भागात कोटा, रझदा आणि लगतच्या खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविली जात आहे. गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानी ड्रोन चार वेळा भारतीय हद्दीत घुसला आहे. आयएसआय ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा भारतात पाठविला गेला होता, अशी माहिती एका गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याने दिली.
सदर शस्त्र लपविण्यासाठी खलिस्तानी दहशतवादी सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या जुन्या तस्करांची मदत घेत आहेत. आता सुरक्षा यंत्रणांना शक्य तितक्या लवकर भारतात पोहोचलेल्या त्या शस्त्रास्त्रांचा शोध घेऊन दहशतवादी जाळे नष्ट करायचे आहे. त्याकरिता बीएसएफ, पोलिस आणि सुरक्षा दलाला कोटा, रझदा आणि आसपासच्या भागात शोध मोहीम राबवण्याचे सांगण्यात येत आहे. त्यात पोलिसांना येत्या काळात मोठे यश मिळू शकते.
दि.30 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी धुक्याने व अंधाराचा फायदा घेत पाकिस्तानी ड्रोन हा कोटा, रझदा येथे 15 किमी अंतरावर आला. तो ड्रोन पाच ते सात किलोग्रॅम वजन उचलण्यास सक्षम असतो. तसेच इतके वजन घेऊन तो वीस किलोमीटरचा प्रवास करू शकतो.