नवी दिल्ली – सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरोक्को, बांगलादेश आणि म्यानमारला करारानुसार भारताकडून कोरोना विषाणूच्या लस पुरविण्यात येत आहेत. मात्र, भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला लस देण्यात येईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकाला शत्रू राष्ट्र मानतात. त्यामुळे दोघांमध्येही वितुष्ट आहे. मात्र, मानवतेच्या दृष्टीकोनातून लस दिली जाईल का, यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने आतापर्यंत भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि सेशल्स येथे लसींची उपकरणे पाठविली आहेत. त्याचबरोबर भारत पाकिस्तानलाही लस पाठवणार आहे काय ? असे पत्रकारांनी श्रीवास्तव यांना विचारले असता ते म्हणाले की, सरकारी स्तरावर किंवा व्यावसायिक तत्वावर लस पुरवण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या विनंतीबद्दल आपल्याला माहिती नाही.
या लसींच्या डोसचे बॉक्स ब्राझिल आणि मोरोक्को येथे व्यावसायिक तत्त्वावर पाठवल्या गेले आहेत. यापूर्वी भारताने कोविशिल्ट लसचे दीड लाख डोस भूतानला तर मालदीवला एक लाख डोस पाठवले होते. तसेच कोवशील्ड लसीचे २० लाख डोस बांगलादेशला आणि १० लाख डोस नेपाळला पाठवले. त्याचप्रमाणे भारताने म्यानमारला दीड दशलक्ष डोस आणि सेशेल्सला ५० हजार डोस पाठविले.
श्रीवास्तव म्हणाले, संबंधित देशातील गरजा लक्षात घेऊन भारत येत्या आठवड्यात आपल्या भागीदार देशांना कोविड वरील लसींचा पुरवठा सुरू ठेवेल. तसेच नियामक मान्यता मिळाल्यानंतर श्रीलंका आणि अफगाणिस्तानला मदत म्हणून लस पुरवल्या जातील, असेही प्रवक्त्याने सांगितले.