इस्लामाबाद – आधीच गेल्या काही वर्षांपासून महागाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये आता कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे संपूर्ण देशातच रुग्णालयांमध्ये खाटा कमी पडत आहेत.
पाकिस्तानमध्ये गुरुवारी ४ हजार ९४७ नवे रुग्ण आढळले असून ९८ मृत्यू झाले. २० जून २०२० नंतर एका दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. २० जूनला २०२० ला २४ तासांत कोरोना संक्रमणाचे ५ हजार ९४८ रुग्ण आढळले होते.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात आतापर्यंत ६ लाख ७२ हजार ९३१ लोकांना कोरोना झालेला आहे. यातील १४ हजार ५३० रुग्ण दगावले तर ६ लाख ५ हजार २७४ बरे झाले.
मात्र पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी इस्लामाबादसह संपूर्ण देशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. इस्लामाबाद येथील पाकिस्तान इन्स्टिट्यूट आफ मेडिकल सायन्सेस येथे एकही बेड रिकामा नाही. रुग्णांना खाटांसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. याठिकाणी संपूर्ण देशातून रुग्ण येतात. आता तर अशी वेळ आली आहे की सरकारी रुग्णालयच खासगीसाठी रेफर करीत आहे.
सरकार टेन्शनमध्ये
इस्लामाबाद येथील पॉलिक्लिनिक रुग्णालयातही वाईट परिस्थिती आहे. इथे एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. या रुग्णालयाने उपचार करण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयाने आपले पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. मात्र सरकार टेन्शनमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहे.