नवी दिल्ली – आपली प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा देखावा सुरू केला आहे. त्यामुळेच मुंबई हल्ल्याचा कट रचणारा झकी उर रहमान लखवी याला पाकिस्तान सरकारने पुन्हा अटक केली आहे. यापूर्वीही त्याला तिनदा अटक केली होती.
लखवीला ज्या आरोपावरून अटक करण्यात आली त्यावरुनच पाकिस्तानचा डाव उघड झाला आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तान यावेळी स्वत:च विणलेल्या जाळ्यात अडकलेला दिसत आहे. एका खासगी एजन्सीमार्फत दहशतवादी कारवायांसाठी पैसे उकळल्याचा आरोप लखवीवर करण्यात आला आहे.
ठोस उपाययोजना नाहीत
झाकीरला फंडिग कुठून आणि कसे मिळत होते हे आता पाकिस्तानला सांगावे लागणार आहे. यातून हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध होईल की, दहशतवाद्यांचा निधी रोखण्यासाठी पाकिस्तानने अद्याप सर्व मार्ग बंद केलेले नाहीत.
पुढील बैठक फेब्रुवारीमध्ये
फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)ची बैठक पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये होणार आहे. गेल्या तीन महिन्यांत दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांविरूद्ध केलेल्या कारवाईचा आढावा या बैठकीत पाकिस्तानला द्यावा लागेल. भारतीय गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांचा असा विश्वास आहे की यापूर्वीही पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दबावाखाली आला तरी सईद, रेहमान आणि अन्य अतिरेक्यांविरूद्ध कारवाई करण्याचे नाटक करतो आणि काही दिवसांनी त्यांना सोडण्यात आले आहे.
१० वर्षांत चार वेळा अटक
गेल्या दहा वर्षांत सईदला किमान चार वेळा अटक करण्यात आली आहे, तर गेल्या पाच वर्षांनंतर दुसऱ्यांदा अटक झाली आहे. मुंबई हल्ल्याचा मुख्य दहशतवादी झाकी-उर-रहमान याला २००९ मध्ये मुंबई हल्ल्याच्या कट रचल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये जामिनावर सोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे पठाणकोट हल्ल्यानंतर मौलाना मसूद अझहरला अटक झाली व नंतर सोडण्यात आले.
एफएटीएफने फटकारले
एफएटीएफ ही आंतरराष्ट्रीय संस्था असून दहशतवादी संघटनांकडे बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित करण्याच्या कारवायांना आळा घालण्यात गुंतलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान या एजन्सीच्या वॉच लिस्टवर आहे आणि तेथील दहशतवादी कारवायांविरूद्ध पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच पाकिस्तानला एकूण २७ प्रकारच्या कारवाया करण्याचे सांगण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत एफएटीएफने पाकिस्तानला कडक शब्दा बजावले होते की त्यांनी सहा प्रकरणांमध्ये समाधानकारक पावले उचलली नाहीत.
एफएटीएफची भीती
दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करण्याचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी आम्ही ठोस कार्यवाही करीत असल्याचे पाकिस्तानला पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत दाखवायचे आहे. त्यासाठीच त्यांनी एफएटीएफच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर डोळ्यात धूळ फेक करण्यासाठीच लखवीला अटक करण्यात आली आहे.