नवी दिल्ली – भारताविरुद्ध कटकारस्थान रचणारा पाकिस्तान आता ड्रोनद्वारे शस्त्र पाठवत असल्याची काही प्रकरणं उघड झालं आहेत. त्याविरोधात सुरक्षा यंत्रणा कारवाई करत आहेत, असं गृहराज्यमंत्री जी. किसन रेड्डी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
गेल्या तीन वर्षांदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये घट झाली असली तरी सीमेवर गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत, असं गृहराज्यमंत्र्यांनी एका दुसर्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितलं.
रेड्डी म्हणाले, की पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवल्याची काही प्रकरणे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आलेली आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये २४ तास प्रभावी देखरेख, गुप्तचर यंत्रणा चौकस बनवणं, सीमा भागात गस्त वाढवणं, सीमा भागातील नागरिकांना सतर्क बनवणं, सीमेवर तारांचं कुंपण बनवणं आणि आधुनिक, उच्च तंत्रज्ञान असलेली उपकरणं बसवणं आदींचा यात समावेश आहे.
गेल्या तीन वर्षांच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरींच्या घटना घटल्या आहेत. परंतु सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. २०१८ मध्ये ६१४ दहशतवादी घटना घडल्या होत्या. २०२० मध्ये त्या घटून २४४ वर आल्या आहेत.
१९९० पासून सुरक्षेच्या कारणामुळे काश्मीर खोर्यातून विस्थापित झालेल्या नोंदणीकृत कुटुंबांची संख्या ४४, १६७ आहे. त्यामध्ये ३९,७८२ हिंदू कुटुंबे आहेत. गेल्या काही वर्षांपासून जवळपास ३८०० कुटुंबे जम्मू आणि काश्मीरला परतले आहेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर ५२० काश्मिरी लोक परतले आहेत. हे सर्व जण पंतप्रधानांच्या विशेष पॅकेजअंतर्गत रोजगार मिळवण्यासाठी परतले आहेत.