मुंबई – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात २१ हजार ९९२ कोटी ५१ लाख ८३ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.
विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या सादर केल्या. महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराबाबत नव्यानं तयार केलेलं शक्ती विधेयक, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सादर केले.
पवार यांनी बातमीदारांना सांगितले की, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण या मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. आमदार रवी राणा काळा बॅनर परिधान करुन सभागृहात आले, तर दोन दिवसांच्या अधिवेशनात दहा विधेयकांवर विस्तृत चर्चा कशी होईल अशी विचारणा, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली.
विधिमंडळ अधिवेशन अधिक काळासाठी होऊन लोकहिताच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र बसून नियमावलीतयार करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
कमी काळाचं अधिवेशन लोकशाहीसाठी योग्य नाही, असं ते म्हणाले. तर, शेतकऱ्यांचा, मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार पळ काढत आहे असा आरोप, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केला.
भारत भालके, विष्णू सवरा, सरदार तारासिंह, जावेद खान, विनायकराव पाटील, अनंतराव देवसरकर, नरसिंहराव घारफळकर, नारायण पाटील, किसनराव खोपडे, सुरेश गोरे आणि डॉ जगन्नाथ ढोणे या आजी माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल, सभागृहानं त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला.त्याला अनुमोदन देणारी भाषणे विरोधी पक्षनेते फडनवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.