नाशिक – शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थी विज्ञान मंथन २०२०-२१’ या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धापरीक्षेसोबतच ‘आहारशास्त्र आणि पर्यावरण’ अशा अनोख्या संकल्पनेनवर आधारित पहिला भारतीय वैज्ञानिक महाकुंभ ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
रोजच्या आहारात समाविष्ट असणाऱ्या अन्नपदार्थांचे पोषणमूल्य व त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यावर प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपले मत मांडावे या प्रमुख संकल्पनेने यंदा वैज्ञानिक महाकुंभ पार पडणार आहे. यात आयआयटी इंदूरच्या शाखेचे विभागप्रमुख महाकुंभात विश्लेषण करणार आहेत. शालेय व जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय अशा तीन टप्प्यांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यात वैज्ञानिक तसेच गणितावर आधारित १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. ४० गुण ‘भारताचे वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान’ आणि विज्ञानयात्री व्यंकटेश बाबुजी केतकर यांचे जीवनकार्य तर उर्वरित ६० गुण शालेय अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. यास्पर्धेसाठी सहावी ते अकरावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. गेल्यावर्षी देशभरातून १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मराठी सह ११ भाषांतून हि स्पर्धा आयोजित केली जाते. राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना २५ हजार, १५ हजार आणि १० हजार असे रोख बक्षीस दिले जाते. तसेच जिल्ह्या व राज्य पातळीवरील विजेत्यांना ५ हजार, ३ हजार आणि २ हजार असे पारितोषिक देण्यात येते. परीक्षेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.vvm.org.in येथे ३०सप्टेंबर पर्यंत अर्ज भरावा. १ नोव्हेंबर रोजी सराव परीक्षा घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.