नवी दिल्ली – बॉलीवूडमध्ये खलनायक म्हणून काम करणाऱ्या रणजीतने आपल्या अभिनयाने त्यालाही एक वेगळी ओळख मिळवून दिली. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला घराबाहेर हाकलण्यात आले होते. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्याने ही आठवण सांगितली.
खलनायक स्पेशल या भागात रणजीत सोबत गुलशन ग्रोवर आणि अभिनेत्री बिंदू देखील सहभागी झाले आहेत. याच एपिसोडचा एक प्रोमो आला आहे. रणजीतचा पहिलाच चित्रपट ‘शर्मीली’. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेंव्हा मला घरातून बाहेर काढले होते. असे का केले, या प्रश्नावर ते म्हणाले की, या चित्रपटात मी राखीचे केस खेचले होते. तिचे कपडे पण फाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर घरातले वैतागले होते. हे काही काम आहे का? जरा डॉक्टर, ऑफिसर असा काही रोल करायचा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचे चित्रपटातील हे खलनायकाचे काम पाहून त्यांची आई प्रचंड चिडली होती. एवढ्या सुंदर आणि नाजूक मुलींना तू त्रास देत फिरतोस, हे काही चांगलं आहे का, असंही आईने विचारल्याचं ते सांगतात. रणजीतने हे केवळ चित्रपटापुरतं मर्यादित असल्याचंही घरी सांगितलं. पण तरीही त्यांनी न ऐकल्याने शेवटी त्यांनी अभिनेत्री राखी हिलाच घरी येऊन समजवायला सांगितलं होतं.