उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील घेतलेल्या परिथितीच्या आढाव्या दरम्यान पुढील दोन दिवसांच्या आत मदतीचा निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. तुळजापूर येथील काटगाव येथे परिस्थितीचा आढावा घेतल्यावर त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येणार असून पुन्हा उभे करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. वर्षाची सुरुवात जागतिक संकटाने झाली, वादळ आले आणि शेवटी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टाळ्या वाजवून मदतीचा आकडा घोषित करण्यासाठी आलो नसून पूर्णपणे मदतीची ग्वाही देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असून तोपर्यंत ९० टक्के पंचनामे पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर संपूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचे आयुष्य उभे करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. धीर सोडू नका, खचून जाऊ नका अशी व्हावी यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली.