कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जातीय संघर्ष निर्माण करीत असल्याचा आरोप केला आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम आणि अब्बास सिद्दिकी यांचा आयएफएस हे दोन्ही पक्ष भाजपचे सहकारी आहेत. त्यामुळे बंगालमधील मुस्लीमांनी यांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन केले. हे दोन्ही पक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी जन्माला घालण्यात आले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील रेदिघी क्षेत्रात प्रचार रॅली काढली. यावेळी त्यांनी ओवेसी आणि सिद्दिकी यांच्याकडे इशारा करताना म्हटले की, ‘हैदराबादचा माणूस आणि बंगालचा फुरफुरा शरीफ भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यांना अल्पसंख्याकांची मते विभाजीत करायची आहेत.’
ओवेसी आणि सिद्दिकी यांनी ममता बॅनर्जी यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. पश्चिम बंगालमधील हिंदूंनी भाजपच्या जातीय संघर्षापासून लांब राहावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले. बंगालमध्ये बाहेरून आलेल्या लोकांपासून सावध राहावे. कारण त्यांना अडचणी निर्माण करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. मी एक हिंदू आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी मी दररोज चंडी मंत्राचे पठण करते. मात्र प्रत्येक धर्माचा मी आदर करते,’ असेही त्या म्हणाल्या.
मला सर्व मंत्र येतात
त्या म्हणाल्या, ‘माझा जन्म एका हिंदू घरात झाला आहे. मला सर्व मंत्र येतात. विशेषतः मां चंडी आणि मां जगदात्रीसाठी पठन केले जाणारे सर्वच मंत्र मला येतात. भाजपमधील किती नेत्यांना हे करता येईल?’ दलित घरांना भेटी देऊन त्यांच्यासोबत जेवण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनाही ममतांनी लक्ष्य केले. ‘मी एक ब्राह्मण महिला आहे आणि माझी सहकारी महिला अनुसुचित जातीतील आहे. ती माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेते. माझ्यासाठी जेवण बनवते,’ असे त्या म्हणाल्या.