नवी दिल्ली ः देशातील ५ राज्यांमध्ये निवडणूक जाहिर झाली असली तरी एकट्या पश्चिम बंगालमध्येच तब्बल ८ टप्प्यात मतदान होणार आहे. अन्य राज्यात मात्र एका दिवशीच मतदान आहे. हा असा भेदभाव का, या प्रश्नावरुन विरोधकांनी भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळेच निवडणूक जाहिर होताच बंगालमधील वातावरण तापले आहे.
तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहे. तर भाजपनं निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इतर राज्यांमध्ये कमी टप्प्यात मतदानाची प्रक्रिया घेत असताना पश्चिम बंगालमध्ये अनेक टप्प्यात मतदान का घेतले जात आहे, असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी असामाजिक तत्वांना नियंत्रित करण्याची गरज असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
ममता बॅनर्जींचा आरोप
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. इतर राज्यात एका टप्प्यात मतदान होत आहे. मात्र बंगालमध्ये अनेक टप्प्यात मतदान का घेतलं जाणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग लोकांना न्याय देणार नाही, तर लोक कुठे जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्यानंतरच निवडणुकांची तारीख घोषित करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.
माकपच्या प्रश्नांच्या फैरी
बंगालमधील निवडणूक एक महिना लांबवण्याचे कारण निवडणूक आयोगानं सांगावं, असं माकपा सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे. बंगालमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या सरकारला पराभूत करणं गरजेचं आहे. कारण त्यांनीच भाजपला राज्यात प्रवेश करण्याची संधी दिली आहे. टीएमसी सरकारविरोधातील लाट भाजपला फायदा पोहोचवत आहे, असं त्यांनी सांगितलं.
सीपीआयचा टोला
बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणूक घेण्याचं कारण निवडणूक आयोगानं सांगितलं पाहिजे, असं सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांनी म्हटलं आहे. एकीकडे भाजप सरकार वन नेशन वन इलेक्शन म्हणत आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोग बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान घेत आहे. आभासी जगात आणि खऱ्या आयुष्यातील त्यांचे वर्तन विरोधाभासी आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.
क्रिकेट व मतदान
चेन्नईमधील पाच दिवसांचा कसोटी क्रिकेट सामना अहमदाबादमध्ये दोनच दिवसांचा झाला. आणि तामिळनाडूमध्ये एका दिवसात होणारे मतदान बंगालमध्ये आठ टप्प्यात होणार आहे. कोणी या गणिताबद्दल सांगू शकतं का, असा सवाल भाकपा सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी केला आहे.
पण, गरजच काय
हा कुटिल डाव असून, केरळमध्ये १४० तामिळनाडू २३४, पुद्दुचेरी ३० (एकूण ४०४ जागा) या ठिकाणी एका टप्प्यात मतदान होणार आहे. तर आसाम १२६, बंगाल २९४ (जागा ४२०) या ठिकाणी सात ते आठ टप्प्यांची काय गरज आहे, असा प्रश्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. आता बंगामध्ये बदलाची वेळ आली आहे, असं बंगालमधील भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करत म्हटलं आहे.