मुंबई – कोरोना संकटामुळे परिणाम झालेल्या पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर पुनरुज्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुढाकार घेतला आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रविवारी (६ सप्टेंबर) एमटीडीसीमार्फत अनोख्या अशा मोटोहोम कॅम्परव्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत रविवारी हा कार्यक्रम संपन्न झाला.
एमटीडीसीने सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे पर्यटकांना आपल्या आरोग्याची काळजी घेत अतुलनीय महाराष्ट्रातील सौंदर्य पाहता येणार आहे. लॉकडाऊनदरम्यान आणि त्यानंतर प्रवासाच्या योजनांसाठी कॅम्परव्हॅन हा एक प्रभावी उपाय आहे. पर्यटक कॅम्परव्हॅन भाड्याने घेऊ शकतात किंवा एकामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि हॉटेल्स बुक न करता प्रवास करू शकतात, किंवा रेस्टॉरंट ब्रेकसाठी ठेवण्याची गरज नाही. या व्हॅनमध्ये स्वयंपाकघर, एक मिनी बेडरूम, लिव्हिंग रूम, मूलभूत सुविधा आणि टेरेससारख्या सुसज्ज सुविधा आहेत, ज्यामुळे पर्यटकांना घरापासून दूर एक सर्वसोयीयुक्त घराची सुविधा उपलब्ध होते.
मोटोहोम वाहनांमध्ये कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आहे. त्यामुळे सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छता सुनिश्चित केली जाते. कोविड-१९ महामारीविरुद्ध संपूर्ण जग लढत असताना महाराष्ट्रात हा उपक्रम सुरू करून पर्यटन क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी एमटीडीसी ठोस आणि सकारात्मक पाऊल उचलत आहे.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना स्वतंत्रपणे फिरायचे आहे आणि महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन महाराष्ट्राचे सौंदर्य पाहायचे आहे, त्यांना उत्कृष्ट प्रवासाची सोय व पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीचे सरकार व पर्यटन विभाग महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक नकाशावर आणून जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.