मुंबई – राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसमवेत सुमारे २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या विविध भागात हॉटेल, रिसॉर्ट, वेलनेस सेंटर्स, हेल्थ फार्म, थिम पार्क. मेडीटेशन सेंटर, रोपवे, स्विमींग पूल, हॉटेल स्पा, हेल्थ क्लब, बोटींग आदी विविध पर्यटन सुविधांची निर्मिती होणार असून सुमारे ६ हजार ७५४ इतक्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापुढील काळातही या क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलू, असे यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री श्री. ठाकरे, राज्यमंत्री कुमारी तटकरे यांच्यासह पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, सहायक संचालक रवींद्र पवार यांच्यासह आदरातिथ्य क्षेत्रातील उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मांडके अँड मांडके ग्रुप (असगोली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), महर्षी वेदीक हेल्थ प्रा.लि. (वहनगांव, ता. मावळ, जि. पुणे), मेसर्स शिवाई कृष्णा रोपवेज (सिंहगड, पुणे), हॉटेल नागपूर अशोक (लक्ष्मी नगर, नागपूर), ॲटोमॅटीक होटेल्स अँड रिसॉर्टस् प्रा.लि. (सातपूर, नाशिक), ब्लू शाईन हॉस्पिटॅलिटी (मुनगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), बीच कॉटेजेस (मोरवे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), ओशन व्ह्यू रिसॉर्टस् (मुनगे सदेवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), निलकंठ लेइझर एलएलपी (हातगड, ता. सुरगणा, जि. नाशिक), लेक व्ह्यू व्हेन्च्युअर्स (टाकळी सीम, नागपूर), साईओ इन्फ्रा (जावळी, महाबळेश्वर), मेसर्स ट्रायोटा व्हेन्च्युअर्स (चिखलठाणा औद्योगिक क्षेत्र, जि. औरंगाबाद), श्रीश्री इन्फ्रान्स्ट्रक्चर (मेहरुन, जि. जळगाव) या कंपन्यांबरोबर विविध प्रकल्प, आदरतिथ्य उद्योग यांना चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी तसेच शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध धोरणे, योजनांचा त्यांना लाभ, सवलती मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प जून २०२२ ते २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहेत.
याशिवाय यावेळी जीवन कदम आणि सौरभ भट्टीकर या व्ह्लॉगर यांच्यासमवेतही पर्यटन संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला. हे व्ह्लॉगर राज्यातील पर्यटनाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालना देणार आहेत. यावेळी मुंबईत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या द मुंबई फेस्टीव्हलची तसेच व्हीडीओग्राफी स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली.
पर्यटनमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, शासनाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर केले असून कॅराव्हॅन पर्यटन धोरण लवकरच जाहीर होत आहे. आजच्या सामंजस्य करारातून राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक होत आहे. यातून राज्याच्या सर्वच भागात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. शासनामार्फत राज्यातील सर्व विभागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यात येईल. सर्व विभागांमध्ये पर्यटन महोत्सवासारखे उपक्रम राबविण्यात येतील. शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्याने तसेच यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी केल्याने राज्यात या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे, शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.