नवी दिल्ली – काही राज्यांच्या बेजबाबदारपणामुळे देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या राज्यांमुळे पूर्ण देशात धोका वाढला आहे. त्यामुळे कोणीही बेजबाबदारपणे वागू नये. कोरोना विषाणू पूर्णपणे सक्रिय आहे हे वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्पष्ट होत आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत किंवा कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून संसर्ग झालेल्या रुग्णांना विलगीकरण करण्यात कुचराई होत आहे. त्यामुळेच कोरोनाचा धोका वाढत असल्याचं भूषण यांनी सांगितलं.
महाराष्ट्र, पंजाबसह अनेक राज्यात वाढता प्रादुर्भाव धोकादायक
राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना नियमांचं उल्लंघन करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दर २३.४४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच ज्या लोकांची चाचणी होत आहे त्यापैकी प्रत्येक चौथा व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. संसर्गाची ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीएत.त्यामुळे त्या तत्काळ वाढवल्या पाहिजेत. पंजाबमध्ये ८.९२ टक्के, छत्तीसगडमध्ये ८.२४ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये ७.८२ टक्के संसर्गाची स्थिती आहे, असं भूषण यांनी म्हटलं आहे.
अधिक संसर्ग झालेल्या राज्यांसह देशातील ४७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि इतर अधिकार्यांसोबत राजेश भूषण यांनी शनिवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
सर्वात प्रभावित १० पैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातील
वाढत्या रुग्णसंख्येच्या आधारावरून देशात एकूण ४७ जिल्हे निश्चित करण्यात आले आहेत. यातील १० जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. त्यापैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर यांचा समावेश आहे. त्याशिवाय कर्नाटकमधील बंगळुरू शहर आणि दिल्लीचाही समावेश आहे. पूर्ण दिल्लीला एका जिल्ह्याप्रमाणे मानण्यात आलं आहे.
…तर परिस्थिती स्फोटक
राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून वाढत्या कोरोनारुग्णांवरून इशारा दिला आहे. ज्या जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग कमी दिसत आहे, तो जास्त दिवस कमी राहू शकणार नाही. संसर्गाचा वेग असाच कायम राहिल्यास परिस्थिती स्फोटक होऊ शकते. वेळेत परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात यश आलं नाही, तर कोरोनारूपी राक्षस विक्राळ रूप धारण करू शकतो, असा इशारा त्यांनी दिला होता.