नाशिक – ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी आज ट्रॅफिक एज्युकेशन पार्कला भेट दिली. यावेळी त्यांनी ट्रॅफिक एज्युकेशन पार्कची पाहणी केली व नाशिक फर्स्टच्या आतापर्यंतच्या वाहतुक सुरक्षेतील कार्याबद्दल प्रशंसा केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, नाशिक फर्स्ट उत्तम प्रकारे चालवित हे पार्क चालवत आहे. येथे रस्ता सुरक्षेचे कार्य उत्कृष्ठ प्रकारे सुरु आहे. हे प्रशिक्षण केंद्र इतरांसाठी एक उत्तम उदाहरण ठरेल. नाशिक फर्स्टच्या टीमची समाजाप्रती समर्पित आणि उत्कटपणे झोकुन देऊन काम करण्याची वृत्ती पाहून मी भारावून गेलो. नाशिक फर्स्ट त्यांच्या कामात नेहमीच फर्स्ट राहील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. नाशिक हे ट्रॅफिकच्या बाबतीत एक उत्कृष्ठ मॉडेल शहर ठरेल यासाठी पोलिस विभाग, परिवहन विभाग व महानगर पालिका यासारख्या वाहतुक विषयात काम करणार्या सार्वजनिक संस्था व नाशिक फर्स्टसारख्या समाजसेवी संस्थांना बरोबर घेऊन काम करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे व नाशिक शहर अपघातमूक्त करण्याचे व मृत्युदर शुन्यावर आणण्याचे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक फर्स्ट दरवर्षीप्रमाणे यंदाही १८ जानेवारी २०२१ ते २७ फेब्रुवारी २०२१ भारत सरकार व महाराष्ट्र शासन आयोजीत ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहात उत्साहाने सहभागी होत आहे. नाशिक फर्स्ट खरंतर सातत्याने वर्षभर विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याचे कार्य करीत असते. या अनुषंगाने यावर्षी देखील नाशिक फर्स्ट आरटीओ नाशिकच्या सहकार्याने रस्ता सुरक्षेचे कार्य अविरत सुरु ठेवलेले आहे.
यावेळी नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी नाशिक फर्स्ट व ट्रॅफिक एज्युकेशन पार्क बद्दल माहिती दिली. त्यांनी पुढे सांगीतले की, नाशिक फर्स्टने आतापर्यंत ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे १.४० लाख सहभागींना रस्ता सुरक्षा विषयावर मोफत प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी नाशिकमध्ये असणार्या वाहतुक समस्यांविषयी देखील माहिती दिली. व त्यावरील उपाययोजनांवर देखील चर्चा केली. व पुढे त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे रस्ता सुरक्षा या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरच सुरु होत असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी देखील नाशिक फर्स्टच्या कामाचे कौतुक केले. यावेळी नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी कार्यक्रमास नाशिक विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहाय्यक परिवहन अधिकारी भगत व हेमाडे व नाशिकफर्स्टचे मॅनेजिंग डायरेक्टर देवेंद्र बापट, जनरल सेक्रेटरी मिलिंद जांबोटकर, संचालक जितेंद्र शिर्के, संजय देशमुख, सदस्य जयंतराव हुन्नरगीकर, पृथ्वीराज जाधव, अभय बाग व गौरव धारकर यांसह अणेक पाहुणे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाशिक फर्स्टचे एक्झीक्युटीव्ह सेक्रेटरी भिमाशंकर धुमाळ व रम्या दिलीप, प्रशिक्षक सोनाली पवार व मयुर बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.