मुंबई – राज्यभरातील मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शनिवारी (२९ ऑगस्ट) भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर हजारो मंदिरांबाहेर करण्यात आलेल्या ‘दार उघड उद्धवा’ या घंटानाद आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मॉल, बाजारपेठा , दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देणाऱ्या आघाडी सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी न दिल्यास प्रार्थनास्थळे नाईलाजाने उघडू, असा इशारा देण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, देवयानी फरांदे , अध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले, पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसह विविध धार्मिक संघटना, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत सांगितले की, देशातल्या अनेक राज्यांनी धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप अशी परवानगी दिलेली नाही. सर्व नियम व बंधने पाळून मंदिरे उघडण्याची परवानगी राज्य सरकारने त्वरित द्यावी. सध्याच्या काळात सामान्य माणसाला देवाचा, मंदिरांचा मोठा मानसिक आधार मिळू शकतो.
मिरज येथे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मॉल, बाजारपेठा , दारूची दुकाने सुरु करणाऱ्या राज्य सरकारला मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी वाटत नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळेच या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे राज्यभर १० हजार मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, श्रीक्षेत्र देहू, नाशिक येथील रामकुंड, पुण्यात सारसबाग गणपती, कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर, शिर्डी येथील साई मंदिर येथे हे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार यांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रात देवस्थाने सुरु करण्याबाबत नाकर्त्या सरकारने आजतागायत निर्णय घेतला नाही. अखेर राज्यभर “दार उघड उद्धवा दार उघड” अशी आरोळी ठोकत भाजपातर्फे “घंटानाद आंदोलन” करण्यात आले. राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन कीर्तन सुरू करावे अशी एकमुखाने मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेऊन त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा आम्हीच प्रार्थनास्थळे उघडू असा इशारा देण्यात आला. ‘दार उघड उद्धवा दार उघड’, ‘दारू नको भक्तीचे दार उघड’, ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, ‘भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’, अशा घोषणांनी राज्यभरातील प्रार्थनास्थळांचे परिसर दुमदुमून गेले होते. कोरोनाचे संकट लक्षात घेता फेस मास्क्स, डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून हे आंदोलन करण्यात आले.