नाशिक – माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॅाम्ब प्रकरणात राजकारण चांगलेच पेटले असतांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर अनेक खळबळजनक आरोप केले.
ते म्हणाले की, परमबीर सिंग यांनी जर खोटे आरोप केले असेल त्यांना डिसमीस का करत नाही. त्यांचे एकीकडे कौतुक केले जाते. दुसरीकडे त्यांच्यावर आरोप केले जातात. त्यांच्यावर जर कारवाई केली तर सर्व काही बाहेर येईल, याची भीती महाविकास आघाडी सरकारला वाटत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी वाझे यांची फाईल गायब झाल्याचाही खळजनक आरोप केला.
नाशिक येथे सोमवारी दुपारी १ वाजता भाजपच्या एन.डी. पटेल रोडवरील कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, भाजप महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले की
– राज्याच्या गृहमंत्र्यांनाच १०० कोटीचा हप्ता असतो तर मग ‘वर्षा’ बंगल्यावर किती जातात?
– शरद पवारांनी जनतेची चेष्ठा बंद करावी. त्यांना हे सर्व माहित नाही असे होऊ शकत नाही, त्यांच्या संमतीनेच खाते वाटप झाले. आता ते क्लीन चीट देत आहेत.
– महाविकास आघाडी जनतेला मुर्ख समजते. पण, त्यांना लवकरच कळेल.
– महाविकास आघाडीच्या अनेक घोटाळ्यांचा आणि त्याची माहिती यापूर्वीही उजेडात आणली आहे.
– संजय राऊत यांनी आरोप झाल्यानंतर पैसे परत केले. तसे अडसुळ यांनी करावे.
– कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी महाविकास आघाडी सरकार फार काही करत नाहीय
– वाझे यांच्या गाड्या कोण वापरत होते, याचा खुलासा सरकारने करायलाच हवा.
– एक आयपीएस ऑफीसर थेट गृहमंत्र्यांवर आरोप करतो, हे महाविकास आघाडीला न शोभणारे आहे.
– गृहमंत्री अब्रुनुकसानीचा दावा करण्याची भाषा करतात. याउलट परमबीर सिंग यांना हाकलून का टाकत नाही.
– वाझे प्रकरणाची चौकशी ईडी, कंपनी मंत्रालय व आय़कर मार्फत झाली पाहिजे.
– शिवसेना नेते अनिल परब हेच गृहमंत्रालय चालवत आहेत
– परमबीर सिंग यांचे पत्र खरं असेल तर तत्काळ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या
– शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला वसुलीच्या धंद्यातून मुक्त करावं