पिंपळगाव बसवंत– द्राक्ष, कांदा व्यापा-याने शेतक-यांना फसविल्याचे प्रकार नियमित घडत असतात. मात्र, परदेशी व्यापा-याने भारतीय कृषी व्यापा-याला गंडा घातल्याचे प्रकारही घडू लागले आहेत. पिंपळगाव बसवंत येथील दौलत एक्सपोर्टचे संचालक दिपक लोकनार यांना दुबईतील अहमद फरहान फ्रुट ॲन्ड व्हेजिटेबल कंपनीने द्राक्ष आणि कांदा व्यापारात पन्नास लाखांची फसवणूक केली असून, वारंवार संपर्क साधूनहीही कंपनी पैसे देण्यास तयार नसल्याचे लोकनार यांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी की, लोकनार हे चार वर्षांपासून आखाती देशात द्राक्ष, कांदा, टोमॅटो, भाजीपाला निर्यात करत आहेत. लोकनार यांनी मार्चमध्ये दुबईतील अहमद फरहान फ्रुट ॲन्ड व्हेजिटेबल कंपनीला पन्नास लाखांचा द्राक्ष आणि कांदा निर्यात केला. परंतु, सहा महिने झाले तरी कंपनीचे व्यापारी युसूफभाई पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. पन्नास लाखांची रक्कम त्यांनी अडवली आहे. खासदार भारती पवारांच्या माध्यमातून आपण दुबईच्या दूतवासाकडे तक्रार करणार असल्याचे लोकनार यांनी सांगितले.
सरकारने दिलासा द्यावा
भविष्यात परदेशी व्यापा-यांकडून कृषी निर्यातदारांची फसवणूक होऊ नये म्हणून केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नियम कडक करण्याची गरज आहे. द्राक्ष, कांदा, टोमॅटो, भाजीपाला, डाळिंब अशा नगदी पिकांच्या निर्यातीत सरकारने संरक्षण देणे आवश्यक आहे. दुबई, कतार, ओमान, मलेशिया, सौदी अरेबिया, श्रीलंका अशा देशात निर्यात करताना धोका वाढला आहे. अनेकदा मालाचे पैसे दिले जात नाहीत. फसवणूक करणा-या व्यापारी कंपन्यांना सरकारने बंदी घालावी, व्याजासह रक्कम वसूल करावी, एलसी (अॅडव्हान्स पेमेंट) सारख्या उपाययोजना कराव्यात, तसे झाल्यास शेतकरी, निर्यातदारांना दिलासा मिळेल.
फसवणूक टाळण्यासाठी नियमावली हवी
मी दुबई येथील व्यापा-याला द्राक्ष माल दिला. मात्र, अद्याप त्या व्यापा-याने पैसे अदा केले नाहीत. त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. भविष्यात परदेशात शेतमाल पाठवावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन भविष्यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी नियमावली बनवून नवीन उद्योजकांना उभारी द्यावी.
– दीपक लोकनार, द्राक्ष व्यापारी, कोकणगाव (ता. निफाड)