नवी दिल्ली – आपल्या देशात लोकशाही राज्यपध्दती असून भारतीय राज्य घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क प्रदान केला आहे. ज्यांना प्रत्यक्ष निवडणूकीत मतदान करता येत नाही त्यांना आता इलेक्ट्रॉनिक स्वरुपात टपाल मतदान यंत्रणेची (ईटीपीबीएस) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशीच सुविधा भारताबाहेरील भारतीय मतदारांना देखील देण्यात यावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने सरकारला दिला आहे. सदर सुविधा अद्याप केवळ लष्करी जवानांसाठी उपलब्ध आहे.
निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाच्या विधिमंडळ सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सैन्यातील जवानांच्या मतदाना बाबतीत ईटीपीबीएसची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर आता परदेशी गेलेल्या भारतीय मतदारांपर्यंतही ही सुविधा वाढविता येईल. आयोग पुढे म्हटले आहे की, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या विधानसभा निवडणुकांमध्ये आता निवडणूक आयोग ही सुविधा देण्यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीयदृष्ट्या तयार आहे.
पुढील वर्षी एप्रिल ते जून या काळात या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. टपाल मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीय परंतु परदेशी वास्तव्य (रहिवासी ) असलेल्या नागरिकांकडून निवडणूक आयोगाला विनंती येत आहेत. कारण ते मतदानासाठी भारतात येऊ शकत नाहीत. कारण त्यांच्या नोकरी, शिक्षण किंवा इतर गुंतवणूकीमुळे ते संबंधित देश सोडून भारतात येऊ शकत नाहीत. त्यातच सध्या कोविड -१९ संबंधित प्रोटोकॉलमुळे ही समस्या अधिक गुंतागुंतीची बनली आहे. त्यामुळे सर्व सक्षम मतदारांना मताधिकार संधी देण्यासाठी पर्याय शोधणे आवश्यक आहे.
सध्या परदेशात राहणारे भारतीय मतदार म्हणून मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहेत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईटीपीबीएस सिस्टममध्ये मतपत्रिका पाठविली जातात. ते डाउनलोड करतात आणि ते त्यांच्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यास खास लिफाफ्यात पाठवतात. मतमोजणीच्या दिवशी ही मतपत्रिका सकाळी आठ वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यापर्यंत पोचली पाहिजे, असा नियम आहे. परंतु यात अनेक अडचणी आहेत.