कोलकाता – अवैध कोळसा उत्खनन आणि तस्करी प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची मेव्हणी मेनका गंभीर यांच्या बँकॉक आणि इंग्लंडमधल्या बँक खात्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. या बँक खात्यांमध्ये मनी लॉन्ड्रींगद्वारे मोठी रक्कम पाठवण्यात आली आहे.
अभिषेक यांची पत्नी रुजिरा नरुला बॅनर्जी यांनी रविवारी सीबीआयकडून पत्र मिळाल्यानंतर सोमवारी सीबीआयला पत्र लिहून सांगितलं की, २३ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत अधिकारी त्यांच्या घरी येऊन चौकशी करू शकतात.
आता सीबीआयचे पथक त्यांची मंगळवारी (२४ फेब्रुवारी) चौकशी करणार आहे. सीबीआयच्या पथकात महिला अधिकारीही असतील. मेनका गंभीर यांच्या इंग्लंडमधील बँक खात्यात पूर्ण व्यवहार शेल कंपन्यांद्वारे झाला आहे, असं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं. सीबीआयनं मेनका गंभीर यांनाही नोटीस पाठवली आहे.
सीबीआयच्या पथकानं सोमवारी दुपारी दक्षिण कोलकाता स्थित त्यांच्या घरी चौकशीही केली. दरम्यान पथक त्यांच्या घरात प्रवेश करत होतं, तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्यांची अडवणूक केली. मात्र समजवल्यानंतर ते तयार झाले. रुजिरा यांच्या खात्यातून पाठवण्यात येणारे पैसे कोळसा घोटाळामधील आर्थिक व्यवहारातले असल्याबाबतची माहिती सीबीआयला मिळाली. त्यामध्ये रुजिरा यांचे नाव समोर आले होते. त्याबाबतची माहितीच सीबीआयला हवी आहे.
रुजिरा यांच्या बँक खात्यातून प्रत्येक महिन्यात मेनका यांच्या खात्यात पैसे पाठवले जात होते. रुजिरा यांचे परदेशात चार बँकांमध्ये खाते असून, त्यामधून आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यामुळे कलम १६० अंतर्गत साक्षीदाराच्या रूपात जबाब नोंदविण्यासाठी रुजिरा यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
बंगालमधील काही भागात सार्वजनिक क्षेत्रातली कोल इंडिया लिमिटेड कंपनीची सहाय्यक कंपनी इस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे (इसीएल) काम सुरू असलेल्या भागातून अवैध उत्खनन आणि त्यासंबंधित भ्रष्टाचार आणि विश्वासघाताचा गुन्हा सीबीआयच्या कोलकाता स्थित भ्रष्टाचारविरोधी पथकानं गेल्या वर्षी २७ नोव्हेंबरला नोंदवला होता.
इसीएल बंगाल आणि झारखंड इथं कोळशाचं उत्खनन करते. बंगालच्या आसनसोलपासून ते पुरुलिया आणि बांकुडापर्यंत तसंच झारखंडच्या धनबादपासून रामगढपर्यंत कोळसा खाणींचा पट्टा आहे. त्यातील अनेक खाणींमध्ये उत्खननाचं काम बंद पडलं आहे. परंतु तिथं माफियांकडून अजूनही अवैध उत्खनन सुरू आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये सीबीआयनं या प्रकरणी इसीएलच्या अनेक अधिकारी आणि कर्मचार्यांसह रेल्वे आणि साआयएसएफच्या अधिकार्यांविरोधात गुन्हा नोंदवला होता. संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमतानं कोळशाचं अवैध उत्खनन आणि चोरी होत आहे, असा आरोप सीबीआयचा आहे.
अनूप माझी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असल्याचं सीबीआयनं घोषित केलं होते. सीबीआयकडून २८ नोव्हेंबर २०२० मध्ये बंगालमधील ४५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा व खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय विनय मिश्रा यांच्या कार्यालयांचाही समावेश आहे.