मुंबई – लहान मुले आणि तरुणांना वेडावून सोडणाऱ्या पबजी हा मोबाईल गेम भारतातून हद्दरपार झाल्यानंतर आता अस्सल भारतीय ‘फौ-जी’ मैदानात उतरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर चळवळीला पाठिंबा देण्यासाठी बंगळुरूच्या एका कंपनीने या गेमची निर्मिती केली आहे. या गेमच्या प्री रजिस्ट्रेशनला प्रारंभ झाला आहे.
फिअरलेस अँड युनायटेड गार्ड्स (फौ-जी) असे या गेमचे नाव असून हा पूर्णपणे एक्शन गेम आहे. बंगळुरूच्या एनकोअर गेम्सने फौ-जी तयार केला असून पबजीवर बंदी घातल्यानंतर काहीच दिवसांत अभिनेता अक्षय कुमार याने फौ-जी ची घोषणा केली होती. या गेमसाठी अलीकडेच प्री-रजिस्ट्रेशनला प्रारंभ झाला आहे. सध्या केवळ अँड्रॉईड मोबाईलमध्येच गुगल प्ले-स्टोअरला फौ-जी डाऊनलोड होऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी पहिले नोंदणी करायची आहे. मुख्य म्हणजे आतापर्यंत विदेशी बनावटीच्या मोबाईल गेम्सचे गारूड भारतीयांवर होते. त्यामुळे भारतीय गेम्सला कितपत प्रतिसाद मिळतो, हे वेळच सांगेल. फौजीने भारतीयांसह विदेशातील लोकांचे मन जिंकले तर कदाचित आणखी काही भारतीय कंपन्यांना यापासून प्रेरणा मिळू शकते.