मुंबई – संगीत क्षेत्रासाठी सोमवारचा (१७ ऑगस्ट) दिवस अत्यंत निराशाजनक ठरला. पद्मविभूषण आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते.
वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी संगीत साधना सुरू केली. पंडित जसराज यांचे वडील मोतीराम हेसुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. पंडितजींना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला. संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीत सृष्टीला त्यांनी योगदान दिले. आपल्या गायनातून श्रोत्यांना ईश्वर अनुभूती देणारे, देश-विदेशातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे पंडितजी हे संगीत क्षेत्रातले गान गुरु होते. शास्त्रीय गायनासाठी त्यांना आजपर्यंत अनेक सन्मान, पुरस्कार मिळाले होते. तब्बल आठ दशकापासून अधिक काळ संगीत क्षेत्रात साधना करणारे ते महान साधक होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात अनेक मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.